कोणतही शिवकाव्य येथे शोधा

।।लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू।।

।।लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू।।

छत्रपती राजर्षी शाहूंचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला.छत्रपती राजर्षी शाहूंचे पूर्वाश्रमाचे नाव यशवंतराव होते.

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्युनंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले.लहानपणापासून ते शरीरयष्टीने तगडे व बलवान होते.विद्यार्थीदशेत त्यांनी विविध भाषेवर प्रभुत्व मिळविले.त्यांचे शिक्षण राजकोट,धारवाड येथे झाले.

बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांना राजाराम,शिवाजी हे मुलगे तर आक्कासाहेब,आऊबाई या दोन कन्या होत्या.सन १८९७-९८ साली पडलेल्या दुष्काळ व प्लेगच्या साथीचा त्यांनी कुशलपुर्वक मुकाबला करून प्रजेला त्यातून बाहेर काढले.

वेदोक्त प्रकरण

सन १८९९ साली कोल्हापूरातील धर्मपंडितानी शाहूंना शुद्र ठरवून त्यांचे क्षत्रियत्व अमान्य केले आणि शाहूंचा वेदमंत्राचा अधिकार नाकारला.अशावेळी शाहूंनी कठोर निर्णय घेऊन ब्रह्मवर्गांची वतने बरखास्त केली.वेदोक्त प्रकरणामुळे त्या काळात महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते.
मागास समाजासाठी वसतिगृहे

खेड्यापाड्यातील गरीब मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्यांनी मराठा,जैन,मुस्लिम,लिंगायत,सुतार,हरिजन,चांभार आदि अनेक समाजासाठी वसतिगृहाची स्थापना केली.तसेच मागास समाजासाठी कोल्हापूर संस्थानात पन्नास टक्के शासकीय नोकर्‍या राखीव ठेवल्या.स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी घेतलेल्या या धाडशी निर्णयामुळे मागास समाजाला शिक्षणाची दारे उघडी झाली.

क्रांतीकारी निर्णय

शाहूंनी अस्पृशता नष्ट करण्यासाठी अनेक निर्णय घेतले.कोल्हापूर संस्थानातील विहिरी,पाणवठे,दवाखाने,शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्पृशता पाळण्यास त्यांनी सन १९१८-१९ साली कायदा करून बंदी आणली.महार वतने बरखास्त करून त्यांनी हरिजनांची वेठबिगारीतून मुक्तता केली.तसेच समाजातील बारा बलुतेदारांवरील निर्बंध उठवून त्यांना इतर उद्योगधंदे करण्यासाठी प्रोत्साहन दिले.सन १९१८ साली त्यांनी आंतरजातीय विवाहास परवानगी,बालविवाहास बंदी तसेच विधवा विवाहास मान्यता दिली.याच सुमारास सन १९२० साली त्यांनी देवदासी प्रतिबंधक कायदा करून समाजातील या अनिष्ठ प्रथेला नष्ट केले.त्याकाळात असे धाडशी निर्णय घेणारे शाहूं महाराज खरोखरच श्रेष्ठ होते.

औद्योगिक सुधारणा

शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव यावा यासाठी शाहूंनी कोल्हापूर तसेच जयसिंगपूरला बाजारपेठा वसविल्या.भोगावती नदीवर राधानगरी येथे धरण बांधून कोल्हापूर संस्थानाचा कायापालट केला.कापड उत्पादनासाठी शाहू मिलची स्थापना केली.तसेच सहकारी संस्थांचे जाळे संस्थानात मजबूत केले.
कलाकारांना प्रोत्साहन

शाहूंनी कलाकार मंडळींना राजाश्रय देऊन कलेचा सन्मान केला.बालगंधर्व, केशवराव भोसले यासारखे कलावंत, हैदरबक्षखॉं, केसरबाई, अल्लादियाखॉं यासारखे गायक, बाबूराव पेंटर,आबालाल रहिमान यासारखे चित्रकार शाहूंनी घडविले.मल्लांना उदार हस्ते प्रोत्साहन दिल्यामुळे कोल्हापूर हे भारतातील कुस्तीचे माहेरघर बनले.कुस्तीगिरांसाठी त्यांनी कोल्हापूरात खासबाग येथे भव्य मैदान बांधले.स्वत: शाहूराजे उत्कृष्ट मल्ल होते.

रयतेचा राजा

आपल्या आयुष्यात त्यांनी सदैव रयतेचा विचार केला.त्यामुळे रयतेने त्यांना राजर्षी ही पदवी दिली.द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनामुळे ते खचले.अशातच मधुमेहाचा विकार बळावल्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली.ता.६ मे १९२२ रोजी मुंबईला त्यांचे वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने गोरगरिबांचा वाली काळाच्या पडद्याआड गेला.त्यांच्यानंतर त्यांचे थोरले पुत्र राजाराम गादीवर आले.
नवीन राजवाडा,कसबा बावडा कोल्हापूर
नवीन राजवाडा,कसबा बावडा कोल्हापूर